वाडवडिलार्जित मिळकत व स्वअर्जित मिळकत
![]() |
What are the Differences between Succession and Survivorship? |
परंतु जर ती मिळकत स्वतंत्र, एकट्याची, वेगळी असेल तर त्या मिळकतीचा मालक तो एकटाच असतो व त्यावर इतर कुणाचा हक्क असत नाही; मग ती मिळकत त्याला भाऊ, काका, आईकडून मिळालेली असो आणि त्या स्वतंत्र मिळकतीत मुलाला जन्मतः हक्क प्राप्त होत नाही आणि त्याच्या मुलाकडे ती इस्टेट उत्तरजीविता (Survivorship) म्हणून जात नाही तर ती उत्तराधिकाराने (Succession) जाते.
उत्तरजीवितेमध्ये एकत्र कुटुंबाची मिळकत असते व त्यात हिंदूला जन्मतः हक्क असतो. तो हक्क काही वेळेला वाढतो व काही वेळेला कमीही होतो. परंतु उत्तराधिकारामुळे जे हक्कदार आहेत त्या सर्वांनाच हक्क प्राप्त होतो व तेथे मिळकत स्वतंत्र एकट्याच्या कमाईची असते किंवा त्यास भाऊ, आई मिळालेली असते किंवा स्वतःच्या नोकरीच्या उत्पन्नातून घेतलेली असते.
एकत्र कुटुंब आहे आणि ते काही मिळकत एकत्रात वहिवाटतात असे कायद्यामध्ये गृहीत धरले जात नाही. म्हणजे एकत्र कुटुंब असल्यामुळेच असणारी मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे असे गृहीत धरले जात नाही. त्यामुळे जो माणुस असे म्हणतो की, ही मिळकत एकत्र कुटुंबाची आहे तर त्याने ती मिळकत प्रथमतः एकत्र कुटुंबाची आहे हे शाबीत करायला हवे. म्हणजेच ती मिळकत Coparcenery Property सहवारसदारी मिळकत आहे हे शाबीत करायला हवे.
जो मनुष्य मिळकतीमध्ये हक्क सांगत आहे त्याने असे शाबीत करायला हवे की एकत्र कुटुंबाकडे काही मिळकत एकत्र कुटुंबीयांची होती व त्या मिळकतीच्या आर्थिक साहाय्याने काही मिळकत खरेदी केली गेली आहे. त्यामुळे ती एकत्र कुटुंबाची मिळकत आहे किंवा ती मिळकत एकत्र कुटुंबाच्या फंडातून किंवा एकत्र कुटुंबीयांच्या श्रमातून केली गेली आहे व या गोष्टी पुराव्यानिशी कोर्टापुढे सिध्द करायला हव्यात. उत्पन्नाचा स्त्रोत एकत्र कुटुंबाचा असेल तर किंवा एकत्र कुटुंबाच्या आर्थिक साहाय्याने मिळकत मिळवली असेल तर ती मिळकत एकत्र कुटुंबीयांची होते.
जर एकत्र कुटुंबामध्ये एखादी मिळकत खरेदी केली असेल किंवा व्यवसाय काढला असेल तर त्यासाठी लागणारी रक्कम ही एकत्र कुटुंबाकडून वापरली गेली आहे असे दर्शवावे लागेल. त्यासाठी एकत्र कुटुंबीयांकडे पुरेसा आर्थिक गाभा किंवा संपत्ती किंवा साधने होती, हे दर्शवावे लागते. ज्याचे म्हणणे असे असेल की, एखादी मिळकत एकत्र कुटुंबीयाची आहे तर त्याने असे दर्शविले पाहिजे की, पुरेसा गाभा मिळकत मिळविण्यासाठी होता, म्हणजे पुरेसा पैसा एकत्र कुटुंबाकडे होता.
हिंदू एकत्र कुटुंब हे अस्तित्वात आहे परंतु त्यातील एका सहवारसदाराजवळची मिळकत ही एकत्रात आहे अशी धारणा धरली जात नाही. एकत्र कुटुंबामध्ये एखादा सहवारसदार, सहघटक किंवा सहहिस्सेदार असेल आणि त्याची मिळकत असेल तर ती मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे असे गृहीत धरता येत नाही, आणि जो कोणी असे म्हणत असेल की, ही मिळकत एकत्र कुटुंबाची आहे तर त्याने तसे शाबीत करायला हवे की ती मिळकत एकत्र कुटुंबाची आहे. परंतु जेव्हा असे शाबीत झाले की एकत्र कुटुंब हे एकत्रित मिळकत धारण करत होते आणि त्या मिळकतीच्या स्वरुपावरुन आणि त्याच्या किंमतीवरुन बराचसा गाभा तयार होत होता व त्यातून ही मिळकत विकत घेतल्याची शक्यता दिसून येत असेल तर जो म्हणतो की, ही माझी मिळकत स्वयंसंपादित आहे त्याने असे दर्शविले पाहिजे की एकत्र कुटुंबाची मदत न घेता ही स्वतंत्र मिळकत आहे.
Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune