Qualified Property For Partition - Overview and Analysis
वाटपास पात्र मिळकती
![]() |
Qualified Property For Partition - Overview and Analysis |
मिळकती शाबिती वादीवर असते-
सर्व एकत्र कुटुंबाची मिळकत ही वाटपाला पात्र असते. वादीला दाव्यातील मिळकत ही एकत्र कुटुंबाची आहे हे शाबीत करावे लागते.
काही वेळेला जर एखादी मिळकत निरंतर कूळ हक्काने असेल तर ती मिळकत सुध्दा वाटपाला धरली जाते. अविभाज्य संपत्ती जी एकत्र कुटुंबाची आहे तिचे वाटप होत नाही. जंगम मिळकतीचे वाटप होते.
एकत्र मिळकतीचे वाटप केले जात नाही -
एकत्र कुटुंबातील मूर्ती किंवा देऊळ किंवा देव्हारा, समाधी मंदिर यांचे वाटप केले जात नाही किंवा ते विकले जात नाही. त्या बाबतीत कोर्ट खालीलप्रमाणे मार्ग वापरते.
अ)श्रेष्ठ सहदायिक (सहहिस्सेदार) यांना मूर्ती, देऊळ किंवा समाधी वगैरे दिले जाते आणि इतर सर्व हिस्सेदारांना योग्य वेळी प्रार्थना करणेस, पुजा करणेस, भेट देणेस संधी दिली जाते.
ब)सहवारसदार जेवढे आहेत त्यांच्यामध्ये आळीपाळीने त्यांच्या हिश्शाप्रमाणे देऊळ वगैरे धारण करणाऱ्या कोर्ट सुविधा उत्पन्न करुन देते.
क)एकत्र कुटुंबाकडे पुजारी असेल आणि अर्पण केलेल्या वस्तूंवर त्यांचे जीवन चालत असेल तर कोर्ट एखादी स्किम करुन आळीपाळीने अर्पण केलेल्या वस्तू घेण्याची सुविधा देते किंवा एखाद्या सहहिस्सेदाराकडे देवाची पुजा ठेवून येणारे उत्पन्न नियतकालाने प्रत्येकाला हिश्शाप्रमाणे वाटून देण्याची सुविधा उत्पन्न करते. जिना, विहीरी, अंगण, तलाव, कुरण, रस्ते, जाण्याचा मार्ग इत्यादीचे त्यांच्या स्वरुपावरुन वाटप होत नाही त्याबाबत अशी एखादी व्यवस्था केली जाते की सामाईकामध्ये सर्व सहहिस्सेदारांनी त्यांची वहिवाट करावी.
मिळकतीचे उगमस्थान एकत्रातील-
हिंदू कायद्याप्रमाणे कर्ता किंवा सहहिस्सेदार यांनी एकत्र कुटुंबाच्या भागभांवलातून व मदतीतून मिळकत मिळवली अगर प्राप्त केली तर ती मिळकत एकत्र कुटुंबाची असते.
एखाद्या व्यक्तीची किंवा एकत्र कुटुंबातील एखाद्या सभासदाची स्वतंत्र मिळकत वाटपाला पात्र नसते. त्यामध्ये इतर सर्व सभासदांना काहीही हक्क प्राप्त होत नाही किंवा ते त्याचे वाटप मागू शकत नाहीत. कारण ती मिळकत त्याची स्वतःची, स्वकमाईची असते. अज्ञान मुला-मुलींना, बायकोला, आई-वडिलांना पोटगीचा अधिकार असतो. परंतु स्वतंत्र मिळकतीत वाटपाचा हक्क येत नाही.
सर्वसाधारणपणे ज्या वेळी एकत्र कुटुंबामध्ये वाटपाचे विभाजन करण्याचे ठरविले जाते किंवा तुकडे किंवा पृथक्करण करण्याची वेळ येते तेव्हा प्रथम एकत्र कुटुंबाच्या कर्जाचा विचार केला जातो; तसेच ज्यांना पोटगी मिळण्याचा हक्क आहे, त्यांचाही विचार केला जातो किंवा एकत्र कुटुंबात कोणी अविवाहित असतील तर त्यांच्या विवाहाच्या खर्चाचा विचार केला जातो. वाटपाच्या वेळी या सर्व गोष्टींचा विचार करुन वाटप केले जाते. त्यानंतर एकत्र कुटुंबाचे देणे-घेणे पाहिले जाते.
वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाच्या जमिनी, घरे-दारे, सर्व स्थावर व जंगम मिळकती वाटपाला पात्र असतात.
हिंदू एकत्र कुटुंबाच्या एका सभासदाने त्याची स्वतःची स्वतंत्र मिळकत एकत्र कुटुंबाच्या मिळकतीमध्ये स्वतःहून टाकली व त्याचा स्वतःचा वेगळा त्या मिळकतीतील आपला हक्क हेतुपूर्वक सोडला तर ती मिळकत एकत्र कुटुंबाची होते. त्याची स्वतंत्र वेगळी मिळकत संपते आणि एकत्र कुटुंबाची किंवा वारस हक्कदाराची मिळकत म्हणून प्राप्त होते. त्याने स्वतःहून त्याचा स्वतःचा हक्क सोडला आणि स्वतंत्र हक्काचा त्याग केला हि त्याची कृती स्वतःची एकट्याची असते; ती कुटुंबाने स्विकारली किंवा नाकारली ह्याचा प्रश्न नाही.
सामाईक साठ्यामध्ये मिळकत मिसळणे-
स्वतःचा वैयक्तिक हक्क नष्ट करुन तो ही मिळकत एकत्र कुटुंबाची समजतो तेव्हा ही मिळकत एकत्र कुटुंबाची होते. जेव्हा सहदायिक त्याची स्वतःची मिळकत सामाईक साठ्या (Common stock) मध्ये मिसळतो तेव्हा ती देणगी मिळकतीचा हस्तांतरती कायद्याप्रमाणे होते नाही आणि ती स्विकारण्याचा प्रश्न येत नाही. एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत एखाद्या सभासदाने त्याची स्वतःची मिळकत टाकली किंवा दिली म्हणजेच कॉमन स्टॅकमध्ये मिळकत आली की ती एकत्र कुटुंबाची होते.
हिंदू कायद्याप्रमाणे सभासदाच्या स्वतंत्र धंद्याचे स्वरुप-
हिंदू कायद्याप्रमाणे एका सभासदाच्या नावावर वेगळा धंदा असेल तर तो धंदा हा सर्व एकत्र कुटुंबाचा आहे असे गृहित धरले जात नाही. जरी तो एकत्र कुटुंबाचा कर्ता असला तरी जोपर्यंत असे दर्शविले जात नाही की, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीतून हा धंदा वाढला आहे किंवा एकत्र कुटुंबाच्या फंडातून किंवा धंद्याचे उत्पन्न हे एकत्र कुटुंबाच्या इस्टेटीमध्ये मिसळले आहे तोपर्यंत धंद्याबाबतची धारणा वर लिहिल्याप्रमाणे होत नाही. धंदा हा स्वतंत्र असतो.
जरी वेगळे राहत असतील तरी वाटप झाले असे समजत नाहीत-
एकाच गावात सहदायक वेगवेगळे राहतात. सातबारा यावर आणेवारी सामाईकात-एकत्रात वेगवेगळी दाखवली गेली आहे. वेगळा घराचा कर भरत आहेत तर या सर्व गोष्टी मिळून एकत्र कुटुंबाचे वाटप (Metes and Bounds) माप आणि सीमांकनाने झाले असे समजले जात नाही आणि त्यातून असा अर्थ निघतो की, सभासद सोयीने वेगळे रहात असुन जमिन कसत आहेत. परंतु त्याचे वाटप झाले असा अर्थ निघत नाही.
7/12 ला नावे असल्यामुळे वाटप नाही-
7/12 ला आणेवारी निरनिराळ्या जमिनीसंबंधी दाखविली आणि मुले जमिनीची वहिवाट करित असतील तर तो फेरफार हे मुलांमध्ये वाटप असल्याचे दर्शवत नाही. याला जास्तीत जास्त फॅमिली ॲरेंजमेंट (कौटुंबिक व्यवस्था) असे म्हणता येईल की ज्यामध्ये जे लोक दर्शविले आहेत त्यांचे वेगवेगळे हिस्से जमिनीत आहेत. त्यामुळे त्याला आपोआप वाटप झाले असे म्हणता येणार नाही.
वडिलांनी त्यांची स्वतंत्र मिळकत मृत्युपत्राने आपल्या मुलाला दिली तर ती मिळकत वाटपाचा विषय होऊ शकत नाही.
प्रतिवादीने घर मिळकत ही स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केली हे दर्शवू शकला नाही. तसेच, शेतजमिनी त्याच्या स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केल्या असा पुरावा दिला गेला नाही तर अशा परिस्थितीत वादीला वाटप मिळते व कब्जाही मिळतो.
स्त्रिला निरनिराळ्या कायदेशीर मार्गाने मिळकत प्राप्त होते. उदा. नातेवाईकाकडून किंवा परकीय व्यक्तिकडून मिळालेली देणगी किंवा वाटपात, पोटगीत वारसाहक्काने किंवा यांत्रिक कलेने स्वतः प्राप्त केलेली किंवा तडजोडीने प्राप्त झालेली किंवा तिच्या विरुध्द कब्जाने मिळालेली किंवा स्वतःच्या स्त्रीधनाने विकत घेतलेल्या मिळकती या तिच्या एकटीच्या असतात. अश्या मिळकती या वाटपास पात्र नाहीत.
तीन भावांमध्ये घर मिळकत होती. एका प्रतिवादीने असे सांगितले की, दाव्यातील घर त्याच्या हिश्शात पूर्वी दिले आहे. दस्त असा दाखवतो की, सर्वांच्या सह्या दस्तावर आहेत. परंतु त्या दस्तावरचे अक्षर शाबित झाले नाही. केवळ सह्या मान्य केल्यामुळे तो दस्त पुराव्यात ग्राह्य नाही. प्रतिवादी वाटप शाबित करु शकला नाही.
दावा हा वाटपाचा होता व हिस्से ठरविणे व कब्जासंबंधी होता. वादीवर शाबीतीचा बोजा पडतो की, दाव्यातील मिळकती या सर्व एकत्र कुटुंबाच्या होत्या. हे सुरुवातीला शाबीत झाल्यानंतर प्रतिवादीकडे शाबितीचा बोजा पडतो की, दाव्यातील मिळकती या एकत्र कुटुंबाच्या पैशातून खरेदी केल्या नव्हत्या आणि त्या स्वतंत्रपने खरेदी केल्या होत्या. प्रतिवादी म्हणजे आई व तिच्या मुलाने पुराव्याने असे शाबीत करणे गरजेचे आहे की त्याच्यांकडे पुरेसा फंड होता की, ज्यामुळे त्याने या मिळकती खरेदी केल्या आहेत. प्रतिवादी हा पुराव्यानिशी शाबीत करु शकला नसल्याने दाव्यातील मिळकती या प्रतिवादीने स्वतः खरेदी केल्या हे शाबित झाले नाही.
Written by Adv. Sarika Khude
Rajgurunagar, Pune